जगप्रसिद्ध बौद्ध भिक्षू अजान जयसारोंचे उद्यापासून प्रवचन व पायी प्रवास
धम्मसारा शांतीभूमी टाकळीत वास्तव्य : रोज करणार २० किलोमीटर पायदळ प्रवास

बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- थायलंड येथील जगप्रसिद्ध बौद्ध धम्म गुरु भन्ते अजान जयसारो यांचे २९ डिसेंबर ते ६ जानेवारी २०२५ पर्यंत धम्मसारा शांतीभूमी टाकळी (वाघजाळ) येथे सानिध्य लाभणार आहे. परडा, पान्हेरा खेडी, बुलढाणा, वडनेर भोलजी, मलकापूर, नांदुरा,कोथळी व मोताळा असे रोज २० किलोमीटर पायी चालून प्रत्येक ठिकाणी सकाळी साडे अकरा वाजता प्रवचन होणार आहे.
भन्ते अजान जयसारो यांनी अरण्यवास केला आहे. जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरु, प्रकांड पंडित, अभ्यासक, जगभरात तथागत भगवान बुद्धांचा मानवता, मैत्री आणि करुणेचा संदेश प्रसारित करणारे आचार्य, विचारक, संशोधक लेखक आहेत. सर्वांसोबत सुसंवाद आणि मैत्री साधणारे अशी त्यांची ख्याती आहे. बुद्धांची मैत्री भावना आणि दान पारमिता यावर त्यांची व्याख्याने जगभर गाजली आहेत. भन्ते सौजन्यशील, सुस्वभावी, मितभाषी, प्रियदर्शी आणि धम्मविनयाचे पालन करणारे आहेत. त्यांचे दर्शन दुर्लभ आहे. त्यांच्या वास्तव्यादरम्यान परडा, पान्हेरा खेडी, बुलढाणा, वडनेर भोलजी, मलकापूर, नांदुरा, कोथळी व मोताळा येथे त्यांचे प्रवचन होणार आहे. या ऐतिहासिक दुर्मिळ व मंगलमय संधीचा लाभ घेऊन धम्म प्रवचनास उपस्थित रहावे असे आवाहन दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट बुलढाण्याच्या सभासदांनी केले आहे.