श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयात रासेयोच्या वतीने “वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा” यांची पुण्यतिथी साजरी

बुलढाणा: आपला बुलढाणा जिल्हा बातमी :- श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयात वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने शुक्रवार, दि. २०/१२/२०२४ रोजी साजरी करण्यात आली. प्राचार्या डॉ. अलका मानकर यांच्या हस्ते कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ज्या महामानवाच्या नावाने अमरावती विद्यापीठ ओळखले जाते, ते म्हणजे स्वच्छतादूत राष्ट्रसंत गाडगे महाराज. गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. समाज प्रबोधन करण्यासाठी ते विविध गावांमध्ये जात असत. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रूढी-परंपरा, अंधश्रध्दा, नवसप्रथा, कर्मकांड यावर प्रहार करून सर्वसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचे कार्य केले. तसेच दशसूत्रीतील अन्न, वस्त्र, रोजगार, शिक्षणासाठी मदत, औषधोपचार या संदेशातून भोळ्याभाबड्या जनतेला उन्नतीचा मार्ग दाखविला. समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगे बाबा देत. गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे ते समाजसुधारक होते.
या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. शांताराम भोये यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनंदा डेकाटे यांनी केले होते. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. डॉ. गजानन विरकर, प्रा. डॉ. प्रतिभा आत्राम, प्रा. डॉ. सुचिता दिघे, प्रा. डॉ. सचिन मुखमाले, प्रा. डॉ. रविकुमार शिंदे, प्रा.सुनील चव्हाण, प्रा. सुप्रिया गेडाम, प्रा. स्वाती कदम, प्रा. साई सुकळकर, प्रा. कोल्हे, श्रीमती गोसावी ताई, श्री. परेश जवंजाळ सर, आदी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.