सामाजिक बदलाचे पाऊल: दिवंगत पतीच्या नावे यंदा देती कोणाची राणी…
विधवा महिलाही देणार तीळ संक्रातीचे वाण!

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-सामाजिक रूढी प्रथा यांना फाटा देत मानस फाउंडेशनने बुलढाण्यातून सामाजिक बदलाचे रणसिंग फुंकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तीळ संक्रांतीला आता विधवा महिलाही वाण देणार आहेत. तीळ संक्रांतीचे वाण विधवा महिला देत नाही, मात्र प्रथमच हा उपक्रम बुलढाण्यात राबवलीला जातोय. सामाजिक बदलाचे पाऊल ठरणारा हा उपक्रम त्यामुळे चर्चेचा विषय देखील ठरला आहे.
तीळ संक्रांत हा सण महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी सवाष्ण महिला एकमेकींना वान देतात. पारंपारिक पोशाख परिधान करून देती कोणाची राणी … असे म्हणत महिलाना वाण देण्याची प्रथा आहे.मात्र यामध्ये विधवा महिलांना सहभागी करून घेतले जात नाही. नेमकी ही बाब हेरून मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाने यांनी सामाजिक बदलाच्या दिशेने पुन्हा एक पाऊल टाकले आहे. शिवसाई परिवार बुलढाणा या ठिकाणी विधवा महिलांना त्यांनी वाण देण्यासाठी बोलवले आहे. तुळशी नगर मध्ये होणारा हा कार्यक्रम त्यामुळेच लक्षवेधी ठरला आहे.विधवा महिलांना सामाजिक कार्यामध्ये सहभागी करून घेतले जात नाही. त्यांना दूर ठेवण्याकडे समाजाचा कल आजवर राहिलेला आहे. त्यामुळे विधवा ह्या दुर्लक्षित घटक झालेल्या आहे. शुभ कार्यामध्ये तर त्यांना मुद्दामहून दूर ठेवल्या जाते. सणांमध्ये महत्त्वाचा सण असलेल्या तीळ संक्रांतीमध्ये सुद्धा सवाष्ण महिला वान देतात. परंतु विधवांना यातही दूर सारले जाते. विधवांची होणारी ही कुच्चबना पाहता मानस फाउंडेशन यासाठी पुढाकार घेतला असून विधवा महिलाही आता वाण देणार आहे. शिवसाई परिवार मुख्यालयामध्ये याबाबत मानस फाउंडेशनच्या सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
मोठ्या संख्येने सहभागी व्हावे– प्राध्यापक लहाने
मानस फाउंडेशन द्वारा विधवांसाठी आयोजित या कार्यक्रमात विधवा महिलांनी सहभागी व्हावे असे अवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डीएस लहाने यांनी केले आहे. सहभागी विधवा महिलांना यावेळी संक्रांतीची भेटही दिली जाणार आहे प्राध्यापक लहाने यांच्या संकल्पनेतून होणार हा कार्यक्रम समाज बदलाचे पाऊल ठरणार आहे.