सिंदखेड राजात स्त्री शक्ती केंद्र व्हावे- संदीप शेळके
राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त राजवाड्यावर घेतले दर्शन

सिंदखेड राजा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ स्त्री शक्ती केंद्र झाले पाहिजे. ज्यामधून जिजाऊंचा आदर्श घेऊन महिला, युवती पुढे येतील. स्त्री शक्ती केंद्राच्या मागणीसाठी राज्यकर्त्यांना जिजाऊ सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक तथा वन बुलढाणा मिशनचे संस्थापक संदीप शेळके यांनी केली.
राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त १२ जानेवारी रोजी सकाळी त्यांनी राजवाड्यात जिजाऊंचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले नवीन वर्ष बळीराजासाठी सुखा- समाधानाचे, आनंदाचे जावो. त्यांच्या जीवनात समृद्धी येवो. तसेच कापूस, सोयाबीन यासह इतर शेतमालाला चांगला भाव मिळून शेतकरी सुखी व्होवो, अशी प्रार्थना त्यांनी जिजाऊ चरणी केली.
वन बुलढाणा मिशन ही जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास असलेली एक लोकचळवळ आहे. विकासाच्या बाबतीत आपला बुलढाणा जिल्हा अव्वलस्थानी पोहचला पाहिजे याकरिता आपणास काम करायचे आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे स्त्री शक्ती केंद्र झाले पाहिजे अशी मागणी आपण वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून केलेली आहे. येणाऱ्या काळात सुद्धा आपण ही मागणी सातत्याने लावून धरणार असल्याचे संदीप शेळके यांनी सांगितले.