दाभाडी मध्ये दरोडा अन् खून!..

मोताळा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):-दाभाडीच्या बस स्टँडजवळ दाताळा रोडवर पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी काल मध्यरात्री दरोडा पडला. त्यांच्या पत्नी माधुरी टेकाळे यांचा या दरोड्यामध्ये जीव गेला आहे. घरात पती-पत्नी दोघेच होते. दहाव्या वर्गात शिकणारी मुलगी सहली निमित्त बाहेर होती. सकाळी पाच वाजता सदर दरोडा पडल्याची घटना लक्षात आली. कारण डॉक्टर गजानन टेकाळे बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. तर त्यांच्या पत्नी सौ माधुरी टेकाळे गतप्राण झालेल्या होत्या. मृतक माधुरी टेकाळे यांचा चेहरा पूर्णपणे काळा पडलेला होता.
दरोडेखोरांनी बेडरूम मध्ये असलेले कपाटे तोडून दागिने आणि कॅश चोरून नेले असल्याचा अंदाज आहे. झटापटी दरम्यान दरोडेखोरांनी माधुरी टेकाळे यांचा जीव घेतला असावा, असा संशय आहे. डॉक्टर गजानन टेकाळे अत्यवस्थ असून त्यांना मलकापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्याही मेंदूवर मार बसल्याचे समजते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी दाभाडी कडे प्रयाण केले आहे. सदर घटनेने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे.दरोडा टाकून दरोडेखोर पसार झाले. सकाळी 5 वाजे दरम्यान जेव्हा टेकाळे यांचे नातेवाईक घरी पोहोचले तेव्हा सदर प्रकार समोर आला.