छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव-२०२५ अध्यक्षपदी राजेंद्र काळे तर सचिवपदी उमेश शर्मा !

बुलडाणा(आपलं बुलढाणा जिल्हा बातमी): महाराष्ट्रासाठी पथदर्शक व दिशादर्शक ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते पत्रकार राजेंद्र काळे यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी उमेश शर्मा यांचे नाव निश्चित करण्यात आले. दरम्यान मावळते अध्यक्ष धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी, राजमाता जिजाऊ चौकातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर परिसरात अध्यक्षपदाची सूत्रे राजेंद्र काळे यांच्या स्वाधीन केली.
जगात भारी, १९ फेब्रुवारी.. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. हीच जयंती २०१६ पासून बुलढाणा शहरात सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून साजरी करण्याची परंपरा सुरू झाली, २०२५ हे २१व्या शतकातील रौप्य महोत्सवी वर्ष.. त्यामुळे यावर्षी शिवजयंतीचे एक विशेष महत्त्व आहे. त्याच अनुषंगाने आज शनिवार १८ जानेवारी रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर प्रांगणात नियोजनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम सूत्रसंचालनातून प्रा. अमोल वानखेडे यांनी शिवजयंती सोहळ्याची भूमिका विशद केली. त्यानंतर मागील वर्षीच्या कार्यक्रमाचा व खर्चाचा लेखाजोखा अरविंद होंडे यांनी मांडला. यानंतर माजी अध्यक्ष प्रा. अनिल रिंढे, रणजीतसिंह राजपूत, राजेश हेलगे, डॉ. शोन चिंचोले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी मंचावर डॉ. राजेश्वर उबरहंडे व मृत्युंजय गायकवाड उपस्थित होते.अध्यक्षपद निवडीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी ओमसिंग राजपूत, रवी पाटील, पृथ्वीराज गायकवाड, मोहन पऱ्हाड, अरविंद होंडे, राजेंद्र काळे व आदेश कांडेलकर यांनी इच्छा व्यक्त केली. मग छत्रपतींच्या मंदिरात जाऊन या सर्वांनी मिळून राजेंद्र काळे यांचे नाव पुढे केले.. ही घोषणा मावळते अध्यक्ष धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी केली. त्यानंतर याच पद्धतीने सचिव पदाची निवड करण्यात आली, त्या सर्वांमध्ये उन्मेष शर्मा यांचे नाव जाहीर झाले. या दोघांचाही सत्कार आ. संजूभाऊसह सर्व मावळत्या अध्यक्षांनी केला.
शिवजयंती साजरी करू हातात हात घालून- आ. गायकवाड
मागील वर्षीच्या बुलढाणा शहरातील शिवजयंतीची नोंद संपूर्ण भारतभर घेतल्या गेली, अनेक ऐतिहासिक प्रदर्शनासह सार्वजनिक कार्यक्रम व भव्य-दिव्य देखाव्यांमुळे ही शिवजयंती अभूतपूर्व ठरली होती. तीच परंपरा याहीवर्षी कायम ठेवायची आहे. तेव्हा सर्व माजी अध्यक्ष व राहुन गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी या शिवकार्याचा शिवधनुष्य हातात हात घालून पेलायच आहे, असे आवाहन धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी करून नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र काळे व सचिव उन्मेष शर्मा यांचे स्वागत करून त्यांना शिवकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व मावळे मिळून इतिहास घडवूया- राजेंद्र काळे
आपण सर्वजण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, आपण सर्वांनी मला अध्यक्ष केले असली तरी मी एक मावळा म्हणूनच या उत्सवाची जबाबदारी आपल्या सर्वांच्या सहकार्याने पेलण्याचा प्रयत्न करील व आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण ही शिवजयंती भव्य-दिव्य व ऐतिहासिक करूया.. अशा भावना यावेळी नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी व्यक्त करून पावन मंदिर परिसरातील पवित्र जमिनीवर माथा टेकवून सर्व उपस्थितांना वंदन केले.