शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने जनजागृती जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले उद्घाटन

बुलढाणा:- आपल बुलडाणा जिल्हा बातमी:-राज्य शासनाच्यावतीने दि. 1 ते 31 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा महिना राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने बुलढाण्यातील पंकज लध्दड अभियांत्रिकी महाविद्यालयात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. विश्व पानसरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागनाथ महाजन, पंकज लध्दड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष दिपक लध्दड कार्यक्रामास उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले. या जनजागृती कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन यंत्रांच्या वापराबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनाच्या अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून आले आहे. यादृष्टीने या कार्यक्रमात वाहनचालकांनी हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणीसंबंधी जनजागृती करण्यात आली.