बुलढाण्यात ‘सहकारा’चा जागर; सहकार दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत…
दुचाकी-चारचाकी वाहनांची रॅली : टाळ, मृदंगांचा निनाद : पारंपरिक फेटे, वेशभूषेने वेधले लक्ष : पतसंस्थांच्या महिला, पुरुष कर्मचाऱ्यांचा उत्साही सहभाग

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त नागपूर येथून निघालेल्या सहकार दिंडीचे बुलढाणा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. १ फेब्रुवारीला दुचाकी व चारचाकी वाहनांसह सहकार दिंडीच्या रथाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी दिंडीचे उत्साही स्वागत करण्यात आले. या दिमाखदार दिंडी सोहळ्याचे संपूर्ण नियोजन बुलढाणा जिल्हा नागरी फेडरेशनेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्यासह सहकारी पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी केले. सहकाराचा जागर करत ‘सहकार समृद्ध’ करण्याचा संदेश या दिंडीतून देण्यात आला.
नागपूर येथून सहकारी पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वात २९ जानेवारीला सहकार दिंडी निघाली. वर्धा, अमरावती, यवतमाळमार्गाने ३१ जानेवारीला मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात दिंडीचे आगमन झाले. मेहकरातील मिरवणुकीनंतर शुक्रवारी सायंकाळीच बुलढाणा शहरात सहकार दिंडी दाखल झाली. यावेळी बुलढाणा जिल्हा नागरी फेडरेशनेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत करण्यात आले. १ फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता साई लॉन्सवर आमदार संजय गायकवाड, राधेश्याम चांडक, काकासाहेब कोयटे, बुलढाणा अर्बन परिवाराचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांच्या हस्ते सहकार ध्वज फडकविण्यात आला. यानंतर चिखली रोडने दिंडीचे शहरात आगमन झाले. सर्व पतसंस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी आपापल्या दुचाकी व चारचाकी वाहनांसह दिंडी मिरवणुकीत सामील झाले होते. विशेष म्हणजे सर्वांनी फेटे परिधान केल्याने दिंडी सोहळ्याने बुलढाणेकरांचे लक्ष वेधले.
कोमलताई झंवर, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, सुदर्शन भालेराव, संस्थेचे सरव्यवस्थापक कैलास कासट यांच्यासह जिल्हाभरातील पतसंस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले होते.
मान्यवरांचे औक्षण
पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेऊन पतसंस्थांच्या महिला कर्मचाऱ्यांनी दिंडीची शान वाढविली. सहकार दिंडीमधील मान्यवरांचे ठिकठिकाणी महिला कर्मचाऱ्यांनी औक्षण केले.
‘बीडीसीसी’समोर रांगोळीने स्वागत
सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण तसेच जिल्हा केंद्रीय सहकारी बॅंकेचे सीईओ डॉ. अशोक खरात यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेसमोरच विशाल आणि आकर्षक रांगोळी काढून स्वागत करण्यात आले.
शंभरावर स्वागत कमानी
सहकार दिंडीच्या स्वागतासाठी सर्वच पतसंस्थांच्या वतीने शहरात सर्वत्र शंभरावर स्वागत कमानी उभारल्या होत्या. या कमानी लक्षवेधी ठरल्या. एकंदरीत सहकार दिंडीने शहरवासी भारावून गेले.
अकरा जिल्ह्यांची वैदर्भीय दिंडी
राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे ९ फेब्रुवारीला शिर्डी येथे राज्यातील सर्व पतसंस्थांची सहकार परिषद होत आहे. या परिषदेप्रसंगी सहकार दिंडीचा समारोप होणार आहे. विदर्भातील अकरा जिल्ह्यांमधून सर्व पतसंस्थांची ही सहकार दिंडी निघाली आहे. बुलढाण्यातील दिंडी सोहळा आटोपून ही दिंडी चिखली, देऊळगाव राजा, जालना, छत्रपती संभाजीनगरमार्गे शिर्डीकडे मार्गस्थ झाली आहे.
शिवरायांना वंदन
मिरवणुकीदरम्यान शहरभर मान्यवरांनी सहकार पालखी खांद्यावर घेतली. संगम चौकात या दिंडी मिरवणुकीचा समारोप झाला. या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. ही पालखी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाल स्मारकाजवळ नेण्यात आली. त्या ठिकाणी पूजन व हारार्पण करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली.