जळगांव जामोद आणि सोनाळा येथे जबरी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश!

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: जिल्ह्यातील जबरी चोरीच्या घटनांवर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. जळगांव जामोद येथे झालेल्या जबरी चोरीच्या प्रकरणाचा तपास करून स्थानिक गुन्हे शाखेने एक आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून 1,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.08 डिसेंबर 2024 रोजी जळगांव जामोद येथे शेतात जात असलेल्या महिलेवर हल्ला करून तिच्या गळ्यातील 18,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल जबरदस्तीने पळवून नेण्यात आले होते. पोलिसांच्या तपासात आरोपी काझी मझहरोद्दिन झुबेरोद्दीन (रा. राणीपार्क, जळगांव जामोद) याचा समावेश निष्पन्न झाला. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल आणि 60,000 रुपयांची मोटारसायकल जप्त करण्यात आली.
अटक केलेल्या आरोपीने सोनाळा येथे केलेल्या जबरी चोरीची कबुली दिली असून, त्याच्याकडून इतर गुन्ह्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अशोक लांडे आणि त्यांच्या पथकाने ही मोठी कामगिरी केली. या पथकाने फक्त चार दिवसांत गुन्ह्याची उकल करत आरोपीला गजाआड केले. आरोपीला पोलीस कोठडीत ठेवून इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. बुलढाणा पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईने गुन्हेगारांना धडा मिळाला आहे.