मुंगसरी शिवारात बिबट्याचा हल्ला, वासरू जखमी; शेतकऱ्यांमध्ये घबराट

चिखली (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी): चिखली तालुक्यातील मुंगसरी शिवारात दि. ८ फेब्रुवारीच्या रात्री बिबट्याने हल्ला करून समाधान भाऊराव इंगळे यांच्या गट क्र. ९२ मधील गोठ्याबाहेर बांधलेल्या वासराला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे शिवारातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
संबंधित घटनेत बिबट्याने वासरावर हल्ला केला असून, वासराला गंभीर जखमा झाल्या आहेत. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही मुंगसरी परिसरात वन्यप्राण्यांची हालचाल पाहण्यात आली होती, मात्र वन विभागाकडून यावर कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.वन विभागाच्या हलगर्जीपणावर शेतकऱ्यांचा रोष घटनेनंतर शेतकऱ्यांनी वन विभागाला माहिती दिली असली तरीही बिबट्याला पकडण्यासाठी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे गावकरी अधिकच चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी परिसरात रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली असून, वन विभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
घबराट वाढली, उपाययोजना आवश्यक
- बिबट्याच्या हल्ल्यामुळे मुंगसरीसह परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे. प्रशासनाने या प्रकरणी तातडीने पावले उचलून शिवारातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.