चाकूहल्ल्यात एका महिलेचा मृत्यू, दोन गंभीर…!

खामगाव (आपलं बुलडाणा जिल्हा बातमी) शहरातील शंकर नगर भागात काल रात्री 8:30 वाजता जुन्या वादातून घडलेल्या थरारक घटनेने परिसर हादरला आहे. एका युवकाने तीन महिलांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा अकोल्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन महिला मृत्यूशी झुंज देत आहेत.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला, मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाला वेग दिला. फक्त पाच तासांत आरोपीला आवळून मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश आले.
या दुर्दैवी घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हा हल्ला नेमका कशासाठी झाला याचा तपास पोलीस करत असून, आरोपीला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.