छत्रपतींचे आत्मचरित्र वाचन आणि चर्चासत्राने मानवंदना. आझाद हिंदच्या जिजाऊ लेकींचा शिव सन्मान.
छत्रपतींच्या स्वराज्याचा जगाला हेवा.सतीशचंद्र रोठे पाटील.

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-छत्रपती शिवरायांची नीती आणि शिवचरित्र स्वयंपूर्ण असून येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादाई आहे. पाणी, शेती, कर ,शेतकऱ्यांप्रती जिव्हाळा,सहकार क्षेत्र, धर्माचा आदर, बांधकाम,आरमार,समुद्र तटबंदी आशा सर्वांगीण आघाड्यावर छत्रपती शिवराय आजही अद्वितीय आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य जगाला हेवा वाटणारे ठरले.असे मत शिवव्याख्याते ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी व्यक्त केले.
जिजाऊ ब्रिगेड, रमाई ब्रिगेड, मातृतीर्थ रणरागिणी संघटना, आझाद हिंद महिला संघटना, राणी लक्ष्मीबाई संघटना, आझाद हिंद शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्राचे वाचन 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान बुलढाणा येथे करण्यात आले होते. 19 फेब्रुवारीला शिवरायांच्या जयंतीनिमित्त शिवचरित्राचे वाचन समाप्ती आणि छत्रपती शिवरायांचा विचार या विषयावर चर्चासत्राचे आयोजन जांभरुण रोड, बुलढाणा येथे करण्यात आले होते. यावेळी व्याख्याते म्हणून ॲड रोठेनी उपरोक्त मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेत तर मोहन सोळंके, संतोष बैरवार, सुरेखाताई निकाळजे, शाहीर सिंधुताई अहेर, पंचफुलाबाई गवई, संजय येंडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली.
छत्रपती शिवरायांचा विचार कृतीप्रवण करण्यासाठी पालकांनी मुलावर तसे संस्कार टाकावे. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी व्यक्त केले.यावेळी बुलढाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सवा दरम्यान आयोजित विविध कार्यक्रमात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या आझाद हिंद महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिव सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
गर्जा महाराष्ट्र, शिवरायांची तलवार, जिजाऊंचे संस्कार या पोवाड्यांनी तसेच सामूहिक अभिवादनाने छत्रपती शिवरायांच्या चर्चा सत्राला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन सुरेखाताई निकाळजे यांनी तर आभार प्रदर्शन आशाताई गायकवाड यांनी केले. यावेळी आयोजक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील शिवप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने चर्चासत्राची सांगता करण्यात आली.