अवैध वाळूनं कुटुंब संपवलं, मजुरांवर झोपेतच काळाचा घाला!
वाळूने भरलेला टिप्पर पत्र्याच्या शेडवर केला खाली,पाच जणांचा दबून गुदमरून मृत्यू…….

जाफराबाद( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) वृत्तसेवा:- जाफराबाद तालुक्यांमध्ये पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळेस अवैधरित्या वाळू उपसा केला जातो. या वाळूची वाहतूक सुसाट वेगाने तालुक्यासह विदर्भातील विविध भागांमध्ये होत असते.
रात्री अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने मजूर झोपलेल्या पत्र्याच्या समोर वाळू रिकामी केल्याने वाळू खाली दबून पाच मजुरांचा मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यातील पासोडी-चांडोळ रोडवर पुलाचे काम चालू होते. या कामासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर येथे गुत्तेदाराकडे पूल उभारणीचे काम करत होते. पत्र्याचे शेड करून सर्व मजूर पुलाजवळच राहत होते.
दरम्यान, रात्री सर्व मजूर जेवण करून झोपले होते. एकूण सात जण या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले होते. दरम्यान, या पुलाच्या कामासाठी रात्रीला साडेतीन वाजता वाळू घेऊन एक टिप्पर आले अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याने घाई गडबडीत अंधारामध्ये त्यांनी पत्र्याच्या शेडवरच वाळू पलटी केली. यामुळे शेडमध्ये झोपलेल्या पाच जणांचा दबून मृत्यू झाला.
गणेश काशिनाथ धनवई (वय ४० रा. गोळेगाव) भूषण गणेश धनवई (वय १६ रा. गोळेगाव) सुनील समाधान सपकाळ (वय २० रा. पद्मावती) यांच्यासह अन्य दोघांचा मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे.
दरम्यान, घटनास्थळी तातडीने पोलीस उपस्थित झाले. सदर टिप्पर चालक जाफराबाद तालुक्यातला असून तो रात्री घटना घडताच फरार झाला आहे. याचा पुढील तपास पोलीस करीत आहे…