समाजरत्न पुरस्काराने भगवान गायकवाड सन्मानित

रायपूर :आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- पळसखेड भट येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड यांना स्व. एस. एम. गवई समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील सर्जाई बहुद्देशीय संस्थेच्यावतीने १६ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे प्रदेशाध्यक्ष साहेबराव पाटोळे होते. उद्घाटन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते झाले. सत्यशोधक चित्रपटाचे निर्माता सुनील शेळके यांचा याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सभापती सुभाष पसोडे, माजी गटशिक्षणाधिकारी बी. के. खरात, ज्ञानदेव मानकर, मुकेश गवई, मुकुल पारवे, उत्तमराव बाजड, आरती पांढरे, माजी सरपंच भाग्यश्री गायकवाड, संजय खरात, लिंबाजी साळवे, कृष्णा नाटेकर, कुंदन यंगड, उमेश बाबुळकर, संतोष तिरेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रस्ताविकातून ज्येष्ठ नेते संताराम तायडे यांनी पुरस्कार आयोजनामागची भूमिका मांडली. दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भगवान गायकवाड यांना एस.एम. गवई समाजरत्न पुरस्कार, मंगलाबाई निकाळजे यांना स्व. बाबा तायडे समाजसेवा पुरस्कार, रमाबाई गायकवाड यांना स्वातंत्र्य सेनानी स्व. विष्णुपंत यंगड समाजभूषण पुरस्कार, प्रभाकर लांडगे यांना स्व. विष्णुपंत रत्नपारखी समाजगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
संचालन श्रीकृष्णा चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक तायडे, मंजुळा तायडे, मंगला मानकर, सुनिता शिरसाठ यांच्यासह समाजबांधवांनी परिश्रम घेतले.