पिस्टल काडतूस अन् चाकू.. पण व्यापाऱ्याला लुटण्याचा कट उधळला!

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतेय कां? तर याचे उत्तर होय असेल! कारण दररोज एक तरी घटना पुढे येत आहे. ताजी घटना म्हणजे उद्योजकाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 आरोपींना बुलढाणा एलसीबीच्या पथकाने अटक केली असून, तब्बल 2 लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.विशेष म्हणजे त्यांच्या कडून एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूस, दोन चाकू असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
बालाजी इंडस्ट्रीज बिरसिंगपूर शिवारचे मालक नारायण सिनकर रा. बुलढाणा (तेलाचे व्यापारी) हे दिवसभराचे काम आटोपून रात्रीचे सुमारास माल विक्रीची रक्कम घेवून बुलढाणा स्थित घरी येतात.या बाबतची माहिती घेवून काही गुन्हेगारांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. या बाबतची टिप घेवून, त्यांना रस्त्यात अडवून, रक्कम लुटण्याचा कट रचला होता. दरम्यान बुलढाणा स्था.गु.शा. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी कार्यवाही केली आहे. बुलढाणा शहर ते अजिंठा रोडवर कृषी विज्ञान केंद्र- बुलढाणा जवळ स्वप्निल विष्णु गवळी वय 30 वर्षे रा. ता. भोकरदन जि. जालना, आकाश रमेश गवळी वय 23 वर्षे रा. वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना, पवन जगन सपकाळ वय 25 वर्षे रा. सुंदरवाडी ता. भोकरदन जि. जालना, दत्ता सुनिल राऊत वय 25 वर्षे, रा. मुकुंदवाडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर,लखन शालीग्राम सुर्यवंशी वय 24 वर्षे रा. जनुना ता. जि. बुलढाणा हे आरोपी त्यांचे साथीदारांसह व्यापारी नारायण सिनकर रा. यांना अडवून, त्यांचे कडील नगदी रक्कम लुटण्याच्या उद्देशाने तयार होते.मात्र त्यांचा कट उधळून त्यांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे.रोबोट बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल असून, सदर कामगिरी एसपी विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली आहे.