जनकल्याण यात्रा पोहोचली बुलढाण्यात…
विशेष सहाय्य योजनांची जनजागृती जिल्हाधिकारी कार्यालयातून शुभांरभ; योजनांचा जागर होणार...

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागाच्या योजनांच्या जनजागृतीसाठी राज्यभरात जनकल्याण यात्रा काढली जात असून ही यात्रा मंगळवारी बुलढाणा येथे पोहोचली. बुलढाणा जिल्हयात या जनकल्याण यात्रेचा शुभांरभ निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, तहसिलदार विजय सवडे यांच्या शुभहस्ते झाला.
या कार्याक्रमास महसुल सहाय्यक अमोल टेंभे, अलका मिसाळ, आशामती कांदे, योगेश कापडे, हर्षल लहाने, सिंधुबाई जाधव, सचिन ठाकरे, गजानन ताकतोडे इत्यादी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विशेष सहाय्य विभागाच्या सहा प्रमुख योजनांवर आधारित माहितीपटाचे प्रदर्शन, माहितीपत्रके वितरण आणि मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे थेट बँक खात्यात अनुदान मिळण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली.या जनकल्यान यात्रेचा शुभारंभ विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते दिंडोरी, नाशिक येथे नुकताच करण्यात आला होता. या जनकल्याण यात्रा माध्यमातून विशेष सहाय्य योजनांचा व्यापक प्रसार करण्यात येत असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात या योजनांचा प्रसार करण्यात आला. या यात्रेत मोबाईल एलईडी व्हॅनच्या सहाय्याने राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. गरजू, वंचित, वृद्ध, विधवा, दिव्यांग आणि निराधार नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि त्यांची प्रक्रिया सुलभ करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या सहा योजनांचा जागर : विशेष सहाय्य विभागाच्या सहा प्रमुख योजनांचा जागर या यात्रेद्वारे होणार आहे. त्यात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनांचा जागर केला जाणार आहे. राज्य व केंद्र सरकारच्या सहकार्याने या योजना राबविल्या जात असून लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केले जात आहे. यासाठी लाभार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपल्या तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.
15 दिवस चालणार जनकल्याण यात्रा : ही जनकल्याण यात्रा एकूण १५ दिवस चालणार असून, संपूर्ण जिल्हाभरात फिरून विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. या यात्रेद्वारे नागरिकांना योजनांची संपूर्ण माहिती मिळणार असून, प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. यासाठी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.”राज्य शासन आणि केंद्र शासन गोरगरीब, वंचित, वृद्ध, विधवा, दिव्यांग आणि निराधार नागरिकांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे. डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या उपक्रमामुळे भ्रष्टाचार आणि दिरंगाईला आळा बसला असून, गरजू नागरिकांना सहजगत्या अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समाजातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा.” – नरहरी झिरवाळ, अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री