विधवांनी ठरविले सौंदर्य लेणे तर घालायचेच , शपथही घेतली…
विधवा परिषद सामाजिक बदलाची नांदी ठरेल... प्रा. डी एस लहाने

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. याच दिवसाचे औचित्य साधून मानस फाउंडेशनने कृतीयुक्त पाऊल उचलले.प्रा. डी एस लहाने यांच्यासंकल्पनेत जिजाऊ बहुउद्देशीय संस्था चे अध्यक्ष संतोष रायपूरे यांच्या पुढाकारात मलकापूर येथे महिला परिषद घेतली. ही महिला परिषद आगळीवेगळी ठरली आहे. हजारो विधवा व एकल महिलांनी लावलेली उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावून गेली. परिषदेत एकल महिलांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.विधवा महिलांनी स्वतःच्या उन्नतीसाठी जाचक रूढी बंधने झुगारून पुढे यावे,स्वयंस्फूर्तीने विधवा महिला परिषदेला हजेरी लावत आहे. त्यामुळे या विधवा परिषदा इतिहासामध्ये नोंद होतील अशाच आहे.ही सामाजिक बदलाची नांदी असल्याचे संकल्पक प्रा. डी एस लहाने म्हणाले. विधवांनी पतीच्या निधनानंतर सौंदर्य लेणे घालायचेच अशी “दांडगी “शपथ यावेळी घेतली. त्यामुळे मलकापुरातील विधवा परिषद सामाजिक बदलाची नांदी ठरली आहे.
विधवा महिलांच्या जीवनात उजेड पेरण्यासाठी बुलढाण्यात प्राध्यापक डी एस लहाने यांनी प्रयत्न चालवले आहे. फूले दांपत्यानंतर विधवा महिलांना लहाने यांच्या रूपाने हक्काचा भाऊ मिळालाय. मलकापूर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था हरसोडा यांच्या मदतीने महिला परिषद घेतली. भातृ मंडळ मलकापूर येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेविका शीलाताई संबारे होत्या. तर संतोष रायपुरे, गटविकास अधिकारी वेदिका सरजाणे व तहसीलदार चव्हाण , विद्या तायडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती लाभली.
सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक व भूमिका प्रा. डी एस लहाने यांनी मांडली.ते म्हणाले,महिला भगिनींना तसेही दुय्यम स्थान मिळाले आहे. मात्र विधवा महिलांना अत्यंत टोकाची वागणूक दिली गेली. वर्षानुवर्ष हा अन्याय आपण त्यांच्यावर करत आलो आहो. त्यांना शुभ कार्यामध्ये सहभागी करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. अनेक अनिष्ट रूढी परंपरा याच्यामध्ये त्यांचे जीवन भरडले जाते.आर्थिक प्रश्न तर कायमच भेडसावत आले आहेत. हे प्रश्न सोडवणे विधवा महिलांच्या जीवनातील प्रथम क्रमांकाची बाब आहे. दुर्दैवाने याकडे हवे तसे लक्ष दिले गेले नाही. पतीच्या निधनानंतर विधवा महिलेला मुलांचा सांभाळ करून घर संसार चालवावा लागतो. यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आर्थिक हेळसांड होते. याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच तरुण मुलांनी लग्नासाठी विधवांना त्यांच्या मुलांसह स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. ही काळाची गरज असल्याचे प्राध्यापक लहाने म्हणाले. संतोष रायपुरे, गटविकास अधिकारी वेदिका सर्जाने, तहसीलदार चव्हाण यांनीही प्रसंगी विचार व्यक्त केले.
ठराव वाचनही लक्षवेधी
परिषदेतील महत्त्वाची बाब म्हणजे अनेक ठराव यावेळी पारित करण्यात आले. ठरावांचे वाचन प्रज्ञाताई लांजेवार यांनी केले. त्यांनी एक एक ठराव वाचून दाखवला तेव्हा उपस्थित महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. हे ठराव एक मताने मंजूर करण्यात आले. याचा पाठपुरावा शासन दरबारी केल्या जाणार आहे. संचालन मनीषा वारे ,प्रतिभा भुतेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. ज्योती पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी संदीप जाधव, गौरव देशमुख, किरण पाटील व राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.कार्यक्रम घेण्यासाठी आज सर्वच ठिकाणी आयोजकांना धावपळ करावी लागते. त्यासाठी गाडी घोड्यांची व्यवस्था करावी लागते. मात्र मानस फाउंडेशनच्या एका अवाहनावर हजारो विधवा भगिनी उस्फुर्तपणे सहभागी झाल्या त्यामुळे महिला परिषद यशस्वी झाली. महिलांचा प्रतिसाद पाहता विधवा परिषद सामाजिक बदलाची नांदी ठरणार आहे.