अमानुष प्रवृत्ती विरुद्ध बुलढाण्यात निघाला ‘जन आक्रोश!’
स्व. स्नेहल ताईला न्याय मिळेपर्यंत रक्षाबंधन साजरे करणार नाही!:- पृथ्वीराज गायकवाड

बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- निर्दोष रस्त्यावर मारतात..गुन्हेगार मोकाट फिरतात..हे अन्यायाचे राज्य आहे का? बुलढाण्याच्या स्व. स्नेहलचा काय गुन्हा होता? बीडच्या सरपंच स्व. संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्याची अमानुष प्रवृत्ती अशीच बळावणार का? अशा सवालांनी ‘जन आक्रोश मोर्चा’ गहिवरला!
स्व.स्नेहल चौधरीच्या त्रिशरण चौकातील वेदनादायी अपघातात प्रकरणातील आरोपीला व बीडच्या सरपंच देशमूख यांच्या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना अतिक्रुर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज बुलढाणा बंद ठेवून सर्वपक्षीय ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.दरम्यान स्व. स्नेहलच्या निधनानंतर तिला योग्य न्याय मिळवून द्यावा व बीड हत्या प्रकरणी वाल्मीक कराडसह इतर सर्व आरोपींना भर चौकात अतिक्रूर शिक्षा द्यावी तसेच त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा शिवाय बुलढाण्यात स्पीड मीटर बसवावे, मुलींच्या सुरक्षा संदर्भात उपायोजना कराव्या अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी मोर्चेकरांना आश्वासित केले.
यावेळीधर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड म्हणाले की, जोपर्यंत स्व.स्नेहल ताईला न्याय मिळत नाही तो पर्यंत मी रक्षाबंधन साजरे करणार नाही!’ तर अनुजा सावळे यांनी स्व.स्नेहल चौधरीचा अपघात करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व बीड हत्याकांड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली.
धर्मवीर युथ फाऊंडेशन महाराष्ट्र तसेच सर्व राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने जिजामाता प्रेक्षागार ते जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यान हा मोर्चा काढण्यात येऊन अमानुष प्रवृत्तीचा निषेध नोंदविण्यात आला. मोर्चात ज्येष्ठ नेते विजय अंभोरे,ओम सिंग राजपूत,गजेंद्र दांदळे,वर्षाताई तायडे,आशिष जाधव, श्रीकृष्ण शिंदे यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिकांचा मोठा सहभाग होता.आज सकाळ पासूनच शहरातील सर्वच प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवण्यात आली. शहरात शुकशुकाट जाणवत आहे.