शुल्लक कारणावरून दोन भावांमध्ये वाद वादाचे रूपांतर हत्यांमध्ये…
दोघा भावांमध्ये वाद मारहाणीत एकाचा मृत्यू...

संग्रामपूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- दारू पिऊन घरी येण्याच्या कारणावरून दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाले. संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा गावात १० मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता ही घटना घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप ऊर्फ सोनू विठ्ठल भिवटे आणि त्याचा भाऊ मंगेश ऊर्फ मंगू विठ्ठल भिवटे यांच्यात दारू पिऊन घरी येण्यावरून वाद झाला. या वादाच्या रागातून संदीपने मंगेशवर हल्ला केला. त्याने लोखंडी फुकणी आणि फावड्याच्या दांड्याने मंगेशला मारहाण केली.या मारहाणीत मंगेश गंभीर जखमी झाला आणि तो घरातच कोसळला. घटनेच्या वेळी आरोपी संदीपची चुलत वहिनी तेथेच उपस्थित होती. रात्री ९ वाजताच्या सुमारास पती घरी आल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर लगेच त्यांनी मृतकाच्या घरी जाऊन पाहणी केली असता मंगेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. गंभीर जखमी झालेल्या मंगेशला तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे शेगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, ११ मार्च रोजी पहाटे ४:३० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी दि. १२ मार्च रोजी रात्री उशिरा तामगाव पोलिस ठाण्यात सरकारतर्फे पोलिस हवालदार प्रमोद मुळे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी संदीप ऊर्फ सोनू विठ्ठल भिवटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तामगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार करत आहेत.