सामाजिक कार्यामुळे संदीप शेळकेंचे राजकीय भवितव्य उज्ज्वल- जालिंदर बुधवत
रक्तदान महायज्ञाचे समारोप: राज्यात २७०० पिशव्या रक्तसंकलीत...

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून गेली २३ वर्षे संदीप शेळके सहकार आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. समाजोपयोगी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यास त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. सामाजिक कार्यामुळे त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले.
शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित रक्तदान महायज्ञाचा समारोप १३ मार्च रोजी झाला. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर शिवसेना संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके, अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके, शिवसेना नेत्या जयश्रीताई शेळके, जिल्हा संघटक डी. एस. लहाने, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, तालुकाप्रमुख लखन गाडेकर, गजानन उबरहंडे, गणेश जाधव, एकनाथ कोरडे, विजय इंगळे, अशोक गव्हाणे, विजय इतवारे, अनिकेत गवळी, संजय शिंदे, मोहम्मद सोफियान, राहुल जाधव, संजय गवळी, श्याम पाटील सावळे, समाधान जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि वन बुलढाणा मिशनच्यावतीने ५ फेब्रुवारी ते १३ मार्च दरम्यान रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान आज या रक्तदान महायज्ञाचा समारोप झाला. याअंतर्गत राज्यभर आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २७०० पिशव्या रक्त संकलित झाले आहे. यावेळी बोलतांना संदीप शेळके म्हणाले की, रक्तदान हे जीवनदान आहे. रक्ताचा एक थेंब गरजू रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. त्यामुळे रक्तदान चळवळ घराघरांत पोहचवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करणार आहोत. राजकारणात असलो तरी सामाजिक कार्याचा वसा सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
संदीप शेळके राजकारणातील आश्वासक चेहरा- हर्षवर्धन सपकाळ
कुठलेही कार्य करीत असतांना त्याबद्दल निष्ठा आणि समर्पण असणे अत्यंत गरजेचे आहे. तेंव्हाच ते कार्य यशस्वी होऊ शकते. संदीप शेळके गेल्या दोन तपापासून सहकार आणि समाजकारणात असून आता राजकारणातही सक्रिय झाले आहेत. संघटन आणि पक्षीय जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणातील ते युवा आश्वासक चेहरा आहेत, असे गौरवोद्गार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.