ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ ; ग्रंथदिंडी, परिसंवादाद्वारे वाचन संस्कृतीचा जागर !
साहित्यिक अर्चना देव यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. शहरातील गर्दे वाचनालयाच्या सभागृह येथे आयोजित या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन साहित्यिक अर्चना देव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते मंगळवारी झाले.
यावेळी शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, बाबासाहेब वरणगावकर, उदय देशपांडे, डॉ. किं.वा.वाघ, डॉ. राजेंद्र गणगे, नेमिनाथ सातपुते, अनंत सातव, विष्णू इंगळे, उमेश ढगे यांच्यासह जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी शालेय विद्यार्थी उपस्थित होते.या ग्रंथोत्सवासाठी उपस्थित झालेल्या मान्यवरांनी मनोगत केले. यात त्यांनी आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करतांना ग्रंथ, पुस्तक वाचन संस्कृती जोपासण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
ग्रंथदिंडी उत्साहात
ग्रंथोत्सवाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन करुन शहरातील हुतात्मा स्मारकापासून ते गर्दे वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन साहित्यिक अर्चना देव यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले. या ग्रंथदिंडीत महिला, शाळकरी विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी, सहभागी झाले होते. या ग्रंथदिंडीत कीर्तन, पारंपरिक फुगडी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. यासह सहभागी महिलांनी फुगडीचा देखील आनंद घेतला.
ग्रंथविक्री, प्रदर्शनी व बहुरंगी कार्यक्रम
हा ग्रथोत्सव दि. १८ व १९ मार्चपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवात वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री, कविसंमेलन, व्याख्याने, तसेच विविध बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वाचनप्रेमी, पुस्तकप्रेमींनी ग्रंथोत्सवात सहभागी होवून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभिजात मराठी भाषा आणि आपली जबाबदारी” या विषयावर आधारित परिसंवाद देखील आयोजित करण्यात आले. यात डॉ. एस. एम.कानडजे यांनी व्याख्यानाद्वारे मराठी भाषेचे महत्व विषद केले. या परिसंवादामध्ये डॉ. कि.वा. वाघ, सुनिल वायाळ, नेमिनाथ सातपुते सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निशिकांत ढवळे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन कुरवाडे यांनी केले.
या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. १९ मार्च रोजी सकाळच्या सत्रात कृत्रीम बुद्धीमत्तेचा वाचन संस्कृतीवर होणारा परिणाम, वाचन चळवळीमध्ये सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान या विषयावर परिसंवाद तर दुपारच्या सत्रात कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप कार्यक्रम होईल. या ग्रंथोत्सवात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.