पुनर्विवाहाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सरसावले प्रा.लहाने
एकल महिला पुनर्विवाह सोहळ्याचे बुलढाण्यात आयोजन !

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-पुनर्विवाहाला अनेक सामाजिक घटकांमध्ये आजही मान्यता नाही. त्यातही विधवांचा पुनर्विवाह म्हटला तर त्याकडे फारसे सकारात्मक पाहिल्या जात नाही. महिलेला एखादा मुल असलं की तिचा संसार झाला असे म्हटले जाते.सामाजिक दडपणाखाली अनेक महिला इच्छा असून सुद्धा पुनर्विवाह बद्दल बोलत नाही.मात्र पुनर्विवाहाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी प्रा. डी एस लहाने यांनी धाडसी पाऊल उचलले असून एकल महिलांना मुलाबाळा सकट स्वीकारा त्यांच्यापेक्षा त्यांच्या मुलांवर अधिक प्रेम करा हा संदेश देत पुनर्विवाहाची चळवळ सुरू केली आहे. यंदाही त्यांनी विधवा व एकल महिलांच्या सामूहिक पुनर्विवाह सोहळ्याचे आयोजन बुलढाणा येथे केले आहे.
मानस फाउंडेशनच्या माध्यमातून बुलढाण्यात विधवांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. विधवा परिषदा,विधवा विवाह सोहळे आयोजित करून विधवा विवाहाला सामाजिक मान्यता देण्याचा प्रयत्न माणस फाउंडेशन कडून सतत होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 12 एप्रिल रोजी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बुलढाणा येथे विधवा व एकल महिलांचा सामूहिक पुनर्विवाह सोहळा आयोजित केला आहे.
या सोहळ्यामध्ये समाजातील विविध घटक देखील सहभागी होत आहे. विशेषतः डॉक्टर, व्यापारी वर्गानेही याचे स्वागत केले आहे. सहभागी होणाऱ्या जोडप्यांना संसार बाटली, कपड्यांचा आहेर तसेच पाच लाखाचा विमा दिला जाणार आहे.समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत हा पुनर्विवाह सोहळा होत असून सामाजिक बदलाची ही नांदि आहे. बुलढाण्यामध्ये सुरू झालेली ही चळवळ अनेक जिल्ह्यांमध्ये पसरत असून विधवा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, समाजाने त्यांना सामाजिक घटक म्हणून स्वीकारावे तसेच विधवा महिलांच्या मुलांना स्वीकारण्याची तयारी असेल अशा विवाह इच्छुक तरुणांनी या सोहळ्यामध्ये हजेरी लावावी असे आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी एस लहाने यांनी केले आहे.