खेर्डी येथे जमणार स्वामी भक्तांची मांदियाळी!
श्री स्वामी समर्थ मठात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असं भक्तांना आश्वस्त करणारे सद्गुरु श्री. स्वामी समर्थ महाराज यांच्या खेर्डी, डोंगर खंडाळा (तालुका बुलढाणा ) येथील मठ परिसरात २५ मार्च ते १ एप्रिल पर्यंत स्वामी भक्तांची मांदियाळी जमणार आहे.
श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवाच्या निमित्ताने २५ मार्च पासून पुढील सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिल रोजी दुपारी महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होईल.श्री स्वामी समर्थ मठ खेर्डी डोंगर खंडाळा येथे २५,२६ व २७ मार्चला तीन दिवस दत्तयाग होणार आहे.२८ मार्चला सामूहिक पारायण सकाळी आठ वाजता सुरू होईल. त्यानंतर दुपारी चार वाजता गुरुदेव सेवा भजनी मंडळ (वरवंड) आणि रात्री आठ वाजता गोविंद दास भजनी मंडळ (डोगर खंडाळा) हे आपली भजन सेवा देणार आहेत. २९ मार्चला भागवत धर्मप्रसारक वारकरी मंडळ (तानाजी नगर बुलढाणा) यांचा भजनाचा कार्यक्रम होईल तर रात्री आठ वाजता हनुमान दास भजनी मंडळ (खेर्डी) हे आपली सेवा रुजू करतील. ३० मार्चला दिवसभर श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू राहील. दुपारी चार वाजता जय अंबे भजनी मंडळ (किन्होळा) रात्री आठ वाजता कामेश्वर भजनी मंडळ (खुपगाव) ही आपली भजन सेवा स्वामी चरणी अर्पण करणार आहेत. ३१ मार्चला सकाळी सात वाजता लघु रुद्र अभिषेक तर दुपारी चार वाजता पालखी सोहळा भाविकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. एक एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ भागवताचार्य हभप श्रीराम महाराज गाडेकर (शेलुद तालुका चिखली )यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी एक ते सहा दरम्यान महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. दलाल परिवार बुलडाणा, बुलडाणा अर्बन परिवार व समस्त गावकरी मंडळी डोंगर खंडाळा खेर्डी यांनी केले आहे.