श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयात प्राणिशास्र विभागाच्या वतीने “जागतिक चिमणी दिवस” साजरा…

नांदुरा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- दिवसेंदिवस होत चाललेल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा रेल्वे, जि. बुलडाणा येथे प्राणिशास्र विभाच्या वतीने दि. २० मार्च २०२५ रोजी “जागतिक चिमणी दिवस” महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अलका मानकर यांच्या मार्गदर्शनात प्राणिशास्र विभागप्रमुख प्रा. शांताराम भोये, प्रा. सचिन जाधव आणि प्रा. डॉ. रविकुमार शिंदे यांनी साजरा केला.
२० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी साजरा करण्यात आला. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरे म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत असलेल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जागरूकता निर्माण करण्यासाठी प्राणिशास्र विभागाच्यावतीने जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त महाविद्यालयात पोस्टर्स व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेत इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग नोंदविले. या स्पर्धेत एकूण २६० विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अलका मानकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.