शहरातील रविवारचा बाजार गर्दीने गजबजला; दोन दिवसात कोट्यवधींची उलाढाल
गुढीपाडवा, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महागाईतही बाजारपेठेत चैतन्य

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-रविवारी असलेल्या गुढीपाडवा व सोमवारी होणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजार गर्दीने अगदी गजबजून गेला. मागील काही दिवसापासून महागाई वाढली असली तरीही नागरिकांच्या उत्साहामुळे बुलडाण्याच्या बाजारात दोन दिवसात सरासरी सुमारे कोटीची उलाढाल झाल्याची माहिती आहे.
बुलडाणा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने तालुक्यातील व मोताळा, धामणगावबढे, येळगाव, शिरपूर, भादोला, बोराखेडी, राजूर, खडकी, हतेडी, दत्तपूर, दे.घाट आदी शेकडो गावे जोडली गेलेली आहे. यामुळे बुलडाणा येथील बाजार सर्वात मोठा बाजार समजला जातो. दर रविवारी या बाजारात लाखोंची उलाढाल ही होते. मागील काही दिवसापासून रमजान व गुढीपाडव्याच्या अनुशंगाने बाजार मोठया प्रमाणात सजला आहे. रविवारचा बाजार असल्याने व गुढीपाडवा असल्याने तसेच सोमवारी रमजान ईद असल्याने या पार्श्वभूमीवर बाजारात प्रचंड गर्दी बघावयास मिळाली. हिंदू समाजात गुढीपाडव्याच्या दिवशी घर, वाहन, सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. तर ईद हा मुस्लीम समाजात दिपावली सारखा साजरा केला जातो. रमजान ईद मुळे शहरात सध्या सर्वच दुकानांमध्ये खरेदी करीता लगबग दिसून देत आहे. महिनाभर उपवास नमाज पण करत अल्लाहची इबादत करणाच्या मुस्लिम समाजाची शहरात रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. ईदसाठी घरातील सर्व सदस्यांना नवीन कपडे व आवश्यक साहित्य खरेदी केले जातात. सध्या कापड दुकानात विशेष गर्दी दिसत आहे. महिला कंगन, हार, कानातील रिंगा या अलंकाराच्या वस्तू खरेदीला प्राधान्य देत आहेत.
रविवारचा बाजार हा यंदा महत्वाचा असल्याने शहरातील जनता चौक, जयस्तंभ चौक, मलकापूर रोड, बाजार लाईन, नगरपालिका कार्यालय परिसर, इक्बाल चौक, सराफा लाईन आदी परिसर गर्दी मुळे ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले.
ड्रायफ्रूटच्या दुकानात उडाली झुंबड
ईदचा स्पेशल मेनू म्हणून घराघरात शिरखुर्मा बनवल्या जातो. सणानिमित्त येणाऱ्या पाहुण्याचे स्वागत शिरखुर्मा देवून स्वागत करण्याची प्रथा आहे. शिरखुर्मा साठी खजूर, खोबरे, काजू , बादाम, किशमिश, चारोळी, पिस्ता आक्रोड यांचा प्रामुख्याने वापर होतो. त्यामुळे बाजारात आलेल्या सुकामेव्याच्या दुकानात ग्राहकांची झुंबड बघावयास मिळाली.
कापड व्यापारी झाले खुश…
उन्हाळ्यातील लग्र सराई संपल्यावर सण व त्योहार थेट नागपंचमीच्या नंतरच येतात. त्यामुळे पुढील चार महिने कपडा व्यापाऱ्यांचा धंदा मंद राहतो. यंदा शेतकऱ्यांचे नवीन वर्ष, व मुस्लीमांचा रमजान एकत्रच आल्याने कपडा व्यापाऱ्यांचा यंदा चांगलाच धंदा झाल्याने व्यापारी वर्गात उत्साह दिसून आला.
या साहित्याची झाली मोठया प्रमाणात खरेदी
दुध – ७० ते ८० रूपये (एक लिटर),शेवई – १०० रुपये (एक किलो),काजू – २४० रुपये (पाव किलो),बदाम – २२० रुपये (पाव किलो),चिरंजीव – ५५० रुपये (पाव किलो),किसमिस – १०० रुपये (पाव किलो),अक्रोड मगज – ३२० रुपये (पाव किलो),पिस्ता – ४८० रुपये (पावकिलो),टरबूजमगज – १६० रुपये (पाव किलो),खरबूज मगज – २४० रुपये (पाव किलो),बेसन – १०० रुपये (एक किलो)
सोन्याला संमीश्र प्रतिसाद..
सोन्याचा भाव ९० हजारावर गेला आहे. या सणासाठी हिंदू व मुस्लिम समाजातील गरीबापासून श्रीमंतांपर्यंत कुटुंब लागणाऱ्या दैनंदिन वापरात येणाऱ्या सर्व वस्तू आपापल्या ऐपती प्रमाणे खरेदी करीत आहेत. त्यामुळे धंदा एकदम कमी आहे असे ही म्हणता येत नाही.
राजेश वर्मा, सराफा, बुलडाणा
दिपावली नंतर मोठी विक्री….
कपडा व्यापाऱ्यांचा धंदा हा दिपावली व रमजान मध्ये चांगल्या प्रकारे होतो. यंदा लग्न सराई, गुढी पाडवा व रमजान एकत्रच आल्याने यंदाची खरेदी विक्री चांगल्या प्रकारे पार पडत आहे. दिपावली नंतर मार्च मध्ये चांगली सुरुवात झाली.
- नितीन पंजवानी, कापड व्यापारी बुलडाणा