किडनी ट्रान्सप्लांट करूनही नियतीने साधला डाव; केमिकल इंजिनिअर युवकाच्या निधनाने हरवला वृद्ध वडिलांचा एकमेव आधार!…

छत्रपती संभाजीनगर ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी वृत्तसेवा ) : आठ महिन्यांपूर्वी किडनी निकामी झाल्याने केमिकल इंजिनीअर युवक खचून गेला. मुलगा कोणत्याही परिस्थितीत जगावा यासाठी वृद्ध वडिलांनी स्वतःची किडनी दान केली. मात्र किडनीच्या प्रत्यारोपणानंतरही प्रकृती बिघडून युवकाचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
समाधान रामदास इंगळे (वय ४८, मूळ रा. माळवंडी, ता. जि. बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या अभियंता युवकाचे नाव आहे. लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या आईचे निधन झाले होते. मातृछत्र हरपलेले सैरभैर झालेल्या समाधान यांचा नंतरच्या काळात घटस्फोट झाला. ते मुंबईला नोकरी करायचे, नंतर छत्रपती संभाजीनगरलाही काही काळ नोकरी केली. उतारवयात वडिलांना ते एकमेव आधार होते.
वडिलांची सेवा करता यावी म्हणून त्यांनी नोकरी सोडून बुलडाण्यात फर्निचर, इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय सुरू केला आणि माळवंडी गावात राहू लागले. मात्र नियतीला बहुधा त्यांचे चांगले पहावले गेले नाही. ८ महिन्यांपूर्वी त्यांची किडनी निकामी झाली. त्यामुळे समाधान खचून गेले होते. वडिलांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी मुलगा जगावा यासाठी स्वतःची किडनी दान केली. मात्र तरीही काही दिवसांपूर्वी समाधान यांची प्रकृती बिघडली. त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी (३१ मार्च) पहाटे साडेबाराच्या सुमारास त्यांचे निधन झाले.