केंद्रीय मंत्री ना.जाधव यांनी घेतली पंतप्रधानांची सहपरिवार सदिच्छा भेट..
नरेंद्र मोदींना दिले बुलढाणा जिल्हा भेटीचे निमंत्रण!

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव व राजेश्रीताई जाधव यांच्या लग्नाचा १ एप्रिलला ४८वा वाढदिवस होता.. त्यानिमित्त त्यांचा परिवार दिल्लीला एकत्र आला होता. आज बुधवार २ एप्रिल रोजी ११ वाजता या परिवाराने पंतप्रधान कार्यालयात जावून नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. तब्बल १५ मिनीट चाललेल्या या भेटीत मोदी यांनी साधला तो कौटुंबीक संवाद. याप्रसंगी प्रतापराव जाधव यांनी विठ्ठल-रुख्मीणीची मुर्ती पंतप्रधानांना भेट दिली. तर मेहकरच्या शारंगधर बालाजींची प्रतिमा सौ.नम्रता सोहम वायाळ यांनी पंतप्रधानांना भेट देवून, भगवान बालाजीची ही सर्वात उंच मुर्ती असल्याचे सांगून लोणार, सिंदखेडराजा व लोणार ऐतिहासीक स्थळांची माहिती मोदीजींना दिली. यावेळी ना. जाधव यांनी पंतप्रधानांना बुलढाणा जिल्हा भेटीचे विशेष निमंत्रण दिले.
पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांची ना. प्रतापराव जाधव, सौ.राजेश्रीताई जाधव, ऋषी जाधव, सौ.मयुरी जाधव, सोहम वायाळ, सौ.नम्रता वायाळ, श्लोक, ओवी व रणवीर यांनी भेट घेतली. ‘जय महाराष्ट्र’ करुन मोदी यांनी या परिवाराशी आधी मराठीतूनच संवाद साधत ‘कसा झाला गुढीपाडवा?’ हा प्रश्न विचारुन कौटुंबीक संवाद साधला. यावेळी संपुर्ण परिवारासोबत छायाचित्रेतर मोदीजींनी घेतलेच, परंतु वेगवेगळेही फोटोज त्यांनी प्रत्येकाला काढू देऊन आनंद द्विगुणीत केला.
विशेष म्हणजे आज संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडल्या जाण्याची घाई असतांनाही संपुर्ण परिवार भेटीला आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपुलकीने साधलेला संवाद जाधव तथा वायाळ कुटुंबाला अर्थात भावून जाणारा ठरला.
- हा तर अदभूत अनुभव- ना.जाधव
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माझ्या कुटुंबासोबत भेट घेण्याचा अविस्मरणीय सन्मान मिळाला. मोदीजींचे प्रेरणादायी विचार व मार्गदर्शन आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायक ठरले. हा क्षण आम्ही सदैव जपून ठेवू! या अद्भूत अनुभवासाठी मनःपूर्वक आभार, पंतप्रधानजी!’ अशी पोस्ट या भेटीनंतर केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर केली आहे.
▪️ओवी व रणवीरला दिले चॉकलेट..
यावेळी ओवी व रणवीर या २ चिमुकल्यांना जवळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना चॉकलेट देऊन त्यांच्याशी गप्पा केल्या. ‘काय केलस गुढीपाडव्याला ?’ असा प्रश्न त्यांनी ओवीला विचारला. ती म्हणाली- ‘आम्ही आधी गुढी उभारली, पूजा केली नंतर राम मंदिरात गेलो व घरी श्रीखंड-बासुंदी खाल्ली..’ तिच्या या प्रश्नावर मोदीजी दिलखुलास हसले. मग तिला विचारलं- ‘ओवीचा अर्थ काय ?’ तिने तिच्यापरीनं सांगितला पण तिची आई नम्रताताईंनी
तो सविस्तर सांगितलं. ‘महाराष्ट्रात संतांनी जे अभंग लिहून ठेवलेयं, त्यातील प्रत्येक ओळीला ओवी म्हणतात..’ रणवीरला मोदीजींनी आजोबाबद्दल कंप्लेंट विचारली. त्याला म्हटलं ‘मराठीतून सांग मला कळते..’ तुझे आजोबा जास्तवेळ दिल्लीला राहत असल्यामुळे तुझ्यासोबत त्यांना वेळ घालवायला भेटत नसेल, असे नंतर मोदीजीच म्हटले.नंतर त्यांनी श्लोकला विचारलं, त्यानं सीए करत असल्याबद्दल सांगितलं व पुढे यूपीएससीच्या माध्यमातून अधिकारी बनण्याचे स्वप्न असल्याचं तो बोलला. म्हणजे ‘बापाच्याच वळणावर जाणार’ असं म्हणून मोदीजी हसले.