सामाजिक उपक्रमांनी सम्राट अशोक जन्मोत्सव उत्साहात….
शंभराहून अधिक जणांची आरोग्य तपासणी ; रोजगार मेळाव्याला तरुणांचा प्रतिसाद

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-प्रियदर्शी चक्रवती सम्राट अशोक जन्मोतस्वानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर व रोजगार मेळावा ५ एप्रिल रोजी बुलढाणा येथील गांधी भवन प्रांगणात पार पडला. राष्ट्रपिता महात्मा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पुढाकारातून झालेल्या कार्यक्रमात शंभराहून अधिक जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर, शेकडो तरुणांनी रोजगार मेळाव्याला उपस्थित राहून रोजगाराची संधी मिळवली.
विश्वकौशल्य स्किल अँड एम्पोरमेन्ट खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सहयोगातून आरोग्य तपासणी, रोजगार मेळावा असे दोन्ही कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैय्यासाहेब पाटील हे होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्याहस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. महामानवांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर हार, पुष्प अर्पण करित उपस्थितांनी अभिवादन केले. प्रास्ताविक पत्रकार दीपक मोरे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर आरोग्य तपासणी शिबिर आणि रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली. आरोग्य तपासणी शिबिरात शहरातील शंभराहून अधिक जणांनी सहभाग घेतला. तपासणीनंतर तज्ञ डॉक्टरांनी त्यांना उपचाराबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान, डॉ.आकाश पवार, डॉ. आदित्य पाटील, डॉ. पंकज शर्मा, डॉ. सौरभ माने, डॉ. आशिष कांदळगावकर, डॉ. ऋषिकेश भोंडे तसेच योगेश लांडकर यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रेम इंगळे यांनी केले. आभार प्रा.राजेश खंडेराव यांनी मानले.
सामाजिक बांधिलकी जपणे आपले कर्तव्य : भैय्यासाहेब पाटील
विविध उपक्रमांनी समाजिक कार्य घडविण्याचा उद्देश आहे. प्रथमतः आपण नागरिक म्हणून विचार केला पाहिजे. सामाजिक बांधिलकी जोपासणे आपले कर्तव्य आहे. शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचा असावा, हेच उदिष्ट ठेवून दरवर्षी प्रियदर्शी चक्रवती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिर व बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
आरोग्य शिबिर गोर गरिबांसाठी उपयुक्त : शल्यचिकित्सक
आरोग्य तपासणी शिबिरामुळे गोर गरिबांना मोठा फायदा मिळतो. अनेकजण महागड्या उपचारा अभावी उपचार घेण्याचे टाळतात. परंतु, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर जेव्हा पार पडते, तेव्हा खऱ्या अर्थाने गोर गरिब रुग्ण उपयुक्त होतात, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी केले.