अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची रताळी गावाला भेट व पाहणी

सिंदखेड राजा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-सिंदखेड राजा तालुक्यातील रताळी येथील पंचफुलाबाई भिमराव जाधव व इतरांनी शासनाच्या ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भात अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची आयोगाने दखल घेतली असून, आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी आज रताळी गावाला भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणी तक्रारकर्त्यांनी संबंधित जमिनीत अतिक्रमण नियमाप्रमाणे केल्याचे नमूद केले आहे. सदर जागेवर सौर कृषी वाहिनी प्रकल्प प्रस्तावित असून काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पाच्या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे स्थानिकांनी पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.श्री. मेश्राम यांनी तक्रारकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यासंदर्भात प्रशासनाला सूचना देण्यात आल्या की, संबंधित कागदपत्रांची नियमाप्रमाणे तपासणी करून अतिक्रमणाच्या जागेबाबत तातडीने अहवाल सादर करावा. तसेच, तक्रारकर्त्यांना पर्यायी जमीन उपलब्ध होऊ शकते का, याचीही चौकशी करावी. तोपर्यंत संबंधित प्रकल्पाचे काम स्थगित ठेवावे, आणि एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, अशा सूचना उपाध्यक्षांनी केल्या.
या वेळी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, तहसीलदार अजित दिवटे, सरपंच उषा पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.