त्या आरोपी अट्टल गुन्हेगाराची मुस्क्या आवळत १० लाखांचा मुद्देमाल जप्त…
शेगाव शहर पोलिसांची दमदार भरीव कामगिरी

शेगाव :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- शेगाव शहरात भरदिवसा दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला होता. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेने तो फसला. यावेळी एका चोरट्याला पकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी अट्टल गुन्हेगार असून, त्याच्याकडून विविध गुन्ह्यांतील ९ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात शेगाव पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
खामगाव रस्त्यावरील विद्यानगर भागात २८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजता घरफोडीचा प्रयत्न उघडकीस आला होता. याप्रकरणी कमलसिंग किरतसिंग परिहार (रा. विद्यानगर, शेगाव) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी शेख अहमद शेख समद (रा. आरास ले-आउट, बुलढाणा) व त्याचा साथीदाराने त्यांच्या घराचे व शेजारील देवलाल ढगे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. दोघेही आरोपी कारमधून (क्र. एमएच २८ बीएच १२०५) पळून जात असताना त्यांचे वाहन कडुनिंबाच्या झाडाला धडकले. यावेळी पोलिसांनी तत्काळ धाव घेत एक आरोपी पकडला. मात्र, दुसरा पसार झाला. शेख अहमद याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. यावेळी त्याने व त्याचा फरार साथीदार सय्यद शकील सय्यद युसुफ (रा. इकबाल चौक, बुलढाणा) याने शेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी जप्त मुद्देमाल करून चोरीच्या घटनेत वापरलेली कार, दोन नंबर प्लेट, दोन लोखंडी रॉड, तुटलेली कुलपे, १५ हजार रोख, विविध घरफोडी गुन्ह्यातील एकूण ९ लाख ८६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.