चिखली मेहकर रोडवर ट्रक, कार आणि दुचाकीमध्ये भयानक अपघात…
हसत्याखेळत्या कुटुंबाचा भीषण अपघातात झाला अंत...

चिखली: आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : जस जसे गुळगुळीत आणि सुसाट वेग धरणारे रस्ते गावापासून गाव खेड्यापर्यंत आता मिळत आहे. तस तसे अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे. आज चिखली मेहकर रोडवर एक असाच विचित्र अपघात घडला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली ते मेहकर रस्त्यावर ट्रक, कार आणि दुचाकीमध्ये हा भीषण अपघात झाला. ट्रकने कारला जोरदार धडक दिली त्यानंतर कार दुचाकीला धडकली. यामध्ये तिघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या भीषण अपघातामध्ये या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
वृत्तानुसार, सर्वप्रथम भरधाव ट्रकने कारला धडक दिली आणि त्यानंतर दुचाकीची ट्रक आणि कारला धडक बसली. अपघात घडल्यानंतर लगेच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, मोटारसायकलचा अक्षरक्षः चुराडा होऊन, मोटारसायकवरील एक महिला, तिचा पती आणि मुलगा अशा तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खैरव फाटा ते मुंगसरी फाट्यादरम्यान हा अपघात घडला. अपघातातील इतर जखमींना चिखली येथे हलविण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.चिखली ते मेहकर रोडवरील खैरव फाट्यावर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा येथील रहिवासी गणेश यादव गायकवाड वय ४५ हे त्यांच्या पत्नी आणि मुलासह ठार झाले. पत्नी लक्ष्मी गणेश गायकवाड वय ४० मुलगा कृष्णा गणेश गायकवाड वय वर्ष १५ अशी त्यांचे नावे आहेत. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले गणेश गायकवाड हे गंभीर अवस्थेत होते, आणि त्यांना चिखली येथील डॉ. जवंजाळ हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.