सागवन गावचे भूमिपुत्र सतिश भाकरे पाटील यांचा भाजपा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार!

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनी सागवन येथील गावकरी मंडळींनी सतीश भाकरे पाटील यांची भाजपा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार व त्यानिमित्त शिवव्याख्यानाचे आयोजन करून आनंदोत्सव साजरा केला.
सर्वप्रथम गावातील तरुणांनी ढोल ताशे नगारे लावून वाजत गाजत सतिश भाकरे पाटील यांची गावातून मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये गावातील सर्व अबाल वृद्ध महिला शेतकरी कष्टकरी तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी होत कौतुक अभिनंदन केले. महिलांनी सडा, रांगोळ्या काढून नवनियुक्त भाजपा तालुकाध्यक्षांचे स्वागत केले.मिरवणुकीमध्ये सर्व गावकऱ्यांनी भगवे फेटे बांधलेले होते तसेच फटाक्यांची आताशबाजी करून आपल्या लाडक्या भूमिपुत्राला शुभेच्छा आशीर्वाद दिले.
गावातील सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या आपल्या गावाच्या तरुणाची भाजप सारख्या राष्ट्रीय विचारांवर चालणारा व जनकल्याणकारी कार्याने संपूर्ण जगभर प्रसिद्धी पावणारा राष्ट्रीय पक्षाचे तालुका अध्यक्षपदी निवड होणे हा सागवन गावाचाच सन्मान आहे असे मानून सर्वांनी एक दिलाने आनंदोत्सव जल्लोष साजरा केला.
हा सत्कार सोहळा छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहूर्तावर असल्याने शिवशाहीर जगदीशचंद्र पाटील यांचे व्याख्यान सुद्धा गावकऱ्यांनी ऐकले. शिवव्याख्यानाचा सर्व गावातील मंडळींनी लाभ घेऊन छत्रपती शिवरायांच्या जगप्रसिद्ध शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या आठवणी पुन्हा एकदा जागृत करून हिंदवी स्वराज्याच्या रयतेसाठी छत्रपतींनी घेतलेल्या अपार कष्टाचा, पराक्रमाचा, त्यागाचा, बलिदानाचा इतिहास सर्वांनी शिवशाहीर जगदीशचंद्र पाटील यांच्या चित्तथरारक व्याख्यानातून अनुभवला.शेवटी शिवरायांच्या आरतीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.सूत्रसंचालन गजानन सोनुने सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सत्यवान वैद्य यांनी केले.