मलकापूर ग्रामीण ग्रा.पं. अंतर्गत येत असलेल्या रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करा
अन्यथा रस्त्यावरील खड्ड्यात बसून अर्धनग्न आंदोलनाचा निलेश चोपडे यांचा इशारा...

मलकापुर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-मलकापूर ग्रामीण ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या अनेक नगरांमधील रस्त्यांची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे न समजणारे कोडे ठरत आहे. त्याचप्रमाणे निकृष्ठ दर्जाच्या पाईपलाईनमुळे लिकेजेस दुरूस्तीमुळे ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे पादचार्यांसह वाहनधारकांना होणारा त्रास पाहता तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करावी, अन्यथा रस्त्यांवरील खड्ड्यात बसून अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल, असा इशारा १३ जून रोजी दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळू चोपडे यांनी ग्रामसेवक ग्रा.पं.कार्यालय यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मलकापूर ग्रामीण ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या बन्सीलाल नगरमधील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा व दयनीय अशी अवस्था झालेली आहे. ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असून पादचार्यांना व वाहन धारकांना आपला जीव मुठीत घेऊन कसरत करीत खड्डे चुकवित मार्ग काढावा लागत आहे. यामध्ये पारख नगर, चैतन्यवाडी, कार्तिक अपार्टमेंट, श्री सिमेंट, रामदास मार्ग ते चक्रधर मार्ग या मार्गांची स्थिती तर विचारता सोय नाही एवढे दयनीय अशी झाली आहे. त्याचप्रमाणे अंतर्गत रस्त्यांची अवस्था तर याहीपेक्षा खराब झालेली आहे. या रस्त्याने मार्गक्रमण करणारे जेष्ठ नागरीक, स्त्रीया, लहान मुले, वाहन धारक यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे एखादवेळी अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
या परिसरातील रस्त्यांवर टिप्पर, चारचाकी, दुचाकीसह आदी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातच नुकत्याच झालेला अवकाळी पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून त्या खड्ड्यांमध्ये पाणी सुध्दा साचले होते. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातही घडले होते. त्याचप्रमाणे सरपटणार्या प्राण्यांचाही धोका वाढला आहे. यातच ग्राम पंचायतची पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन टाकतांना निकृष्ठदर्जाची पाईपलाईन टाकली असल्याने लिकेजेसचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ते लिकेजेस दुरूस्तीमुळे सुध्दा ठिकठिकाणी रस्ता खोदल्यानंतर त्याठिकाणी खड्डे खोदल्याने या रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये अधिकच भर पडली आहे.
या रस्त्यांच्या दुर्दशेबाबत अनेकदा सांगूनही ग्रामपंचायत व प्रशासकांकडून कुठलीही दखल घेण्यात न आल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. तेव्हा येत्या ८ दिवसात रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा दिव्यांग मल्टीपर्पज पाऊंडेशनच्या वतीने रस्त्यांवरील खड्यात बसून अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी बुलढाणा, गटविकास अधिकारी पं.स. मलकापूर, उपविभागीय अधिकारी मलकापूर, ठाणेदार मलकापूर शहर यासह संबंधितांना देण्यात आल्या आहेत.