जागतिक विधवा दिनी आयोजित कार्यशाळेला उस्फूर्त प्रतिसाद…
विधवांच असहाय्य जीवन सुसह्य करण्यासाठी त्यांना बळ द्या.. प्रा. डी एस लहाने

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-विधवा व एकल महिलांचे प्रश्न अनेक आहे.एकाच वेळी त्यांना अनेक आघाड्यांवर संघर्ष करावा लागतो. आर्थिक ओढतान,मुलांचे शिक्षण ,सामाजिक कुचंबना ,सामाजिक असहकार या गोष्टी सातत्याने भेडसावतात. त्यामुळे विधवांच जीवन असहाय्य झाल असून ते सुसह्य करण्यासाठी त्यांना बळ देणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी एस लहाने यांनी केले.
जागतिक विधवा महिला दिवसाचे औचित्य साधून शिवसाई युनिवर्सल बुलढाणा येथे दिनांक 22 जून रोजी विधवा महिला साठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. डी एस लहाने होते. सामाजिक कार्यकर्त्या शहाणाताई पठण,प्रतिभा भुतेकर ,प्रज्ञा लांजेवार ,प्रा.ज्योती पाटील ,मनीषा वारे गजानन मुळे आदीची उपस्थिती राहीली. असंख्य विधवा महिलांनी उपस्थिती लावून आपल्या व्यथा व वेदना या वेळी मांडल्या. उद्घाटन सत्रा नंतर थेट विधवांशी संवाद साधण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या व्यथा व वेदना मांडल्या. आर्थिक ताण व कुटुंबाकडून होणारी कुचंबाना यावर बहुतांश महिलांनी भर दिला. या महिलांना सर्वसामान्य महिलांप्रमाणे त्यांचे हक्क मिळणे ही काळाची गरज असल्याचे प्राध्यापक डी एस लहाने म्हणाले.आपणच आपल्या कुटुंबातील एका महिलेवर अमानुष अन्याय अत्याचार करीत आलो आहोत. ही परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. समाज पुरुषांनी यामध्ये बदल घडविण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला असला तरी त्याला आजही पाहिजे तेवढे बळ मिळालेले नाही.अशावेळी विधवा महिलांची सनद शासन दरबारी मांडणे याला अग्रक्रम दिल्या जाईल असे लहाने म्हणाले. संचालन मनीषा वारे यांनी तर आभार प्रदर्शन एडवोकेट संदीप जाधव यांनी केले.
नाशिकच्या राष्ट्रीय विधवा परिषदेचे प्रा. लहाने यांना निमंत्रण
विधवा प्रथा बंद करण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज आहे. यासाठी राज्यातर्फे एक जनहित याचिका न्यायालयामध्ये लवकरच दाखल केली जात आहे.नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय विधवा परिषदेच्या माध्यमातून यावर चर्चा घडवून आणली जात आहे. देशाच्या विविध भागातून विधवा महिलांसाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, अनेक राज्यांचे प्रतिनिधी, बौद्धिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रा. डी एस लहाने यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. महिलांच्या हक्काची सनद शासनाकडे मांडने व न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून होत असल्याने ही विधवा परिषद विधवा बहिणींसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.